पुणे : भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे (वय८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. विश्वास गांगुर्डे यांच्या पाथिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त उपस्थित होते.
१९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.
१९८०-८५ आणि १९८५-९० दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, १९९९ मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या काळात त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.
गांगुर्डे यांच्या मृत्यूनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते म्हणाले, 'रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि पर्वती मतदारसंघाचे माजी आमदार विश्वासजी गांगुर्डे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. भाजपाचे काम तळागाळात नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कवी मन आणि सतत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.'