जेजुरी: जवळार्जुन ग्रामपंचायतीत माजी आमदार अशोक टेकवडे यांना धक्का बसला असून तेथे त्यांच्या मुलाचा एक मताने पराभव करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सोमनाथ दत्तात्रय कणसे सरपंच म्हणून निवडून आले. तर उपसरपंचपदी शिवसेनेच्या प्रतिभा निलेश राणे या विजयी झाल्या.
या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे च समोर आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांना मोठा धक्का बसला आहे . निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माऊली राणे गटाने सेनेशी हातमिळवणी करीत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुभाष चावरे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक महेंद्र लोणकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच पदासाठी अशोक टेकवडे गटाचे अजिंक्य अशोक टेकवडे तर माऊली राणे गटाकडून सोमनाथ दत्तात्र्यय कणसे यांचे उमेदवारी अर्ज आले. उपसरपंच पदासाठी ही अनुक्रमे टेकवडे गटाकडून संगीता रमेश राणे आणि सेनेच्या प्रतिभा निलेश राणे याचे अर्ज आले. प्रत्यक्ष मतदानात मात्र राणे गटाचे सोमनाथ कणसे आणि सेनेच्या प्रतिभा राणे यांना नऊ पैकी पाच मते मिळाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार अशोक टेकवडे, सुधाकर टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभा करण्यात आला होता तर माऊली राणे गटाकडून त्यांना शर्थीचे झुंज देण्यात आली. सेनेकडून दोन जागा लढवण्यात आल्या होत्या. यात माऊली राणे गटाचे तीन आणि टेकवडे गटाचे चार तर सेनेचे दोन उमेदवार निवडून आले होते. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण सात उमेदवार तर सेनेचे दोन उमेदवार विजयी झाले होते. सरपंच निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सरपंचपदावरून दोन गट निर्माण झाले. सेनेच्या दोन्ही सदस्यानी आपले मत माऊली राणे गटाला दिल्याने टेकवडे गटावर पराभवाची नामुष्की ओढवली. सेनेने मात्र उपसरपंच पद पदरात पाडून घेतले.
निवडवणुकीनंतर मात्र नवनिर्वाचित सरपंच सोमनाथ कणसे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक असून भविष्यात आपण माऊली राणे, माजी आमदार अशोक टेकवडे, खा. सुप्रियाताई सुळे, आ संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू. अशी भावना व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत मात्र माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या मुलाचा पराभव मात्र मोठा चर्चेचा विषय बनला आहे.