मंचर: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे.
तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. मागील वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांची आज महाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी जीआर काढला आहे. राज्य शासनाचे महत्त्वाचे महामंडळ आढळराव पाटील यांना मिळाले असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील प्रबळ दावेदार असून म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्याने अधिक वेगाने कामे होतील अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रादेशिक मंडळाच्या दोन प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून करता येणार आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. गौरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, घरनिर्मितीचा लाभ मिळवून देणे तसेच जास्तीत जास्त लोकांना म्हाडाचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य सरकारने जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. दरम्यान आढळराव पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महायुती शासनाने पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो. माझ्यावर आजवर विश्वास दाखवलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा हा सन्मान आहे, असे मी मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगल्भ संकल्पनेतील 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून या भागाचा विकास करण्याबरोबरच, नवनवीन योजना राबविण्यावर माझा भर असणार आहे.