नारायणगाव : लोकप्रतिनिधी हा राजा नाही, आलेली खुर्ची ही तेवढ्याच काळापुरती असते. त्यांनी लोकांची सेवा केली पाहिजे. मात्र माजी खासदारांचे पद गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आलेली बैचेनी ही शिरूर मतदारसंघाप्रमाणे जुन्नर तालुक्यात माजी आमदाराकडूनही अनुभवयाला मिळत आहे. १५ वर्षांत माजी खासदारांना वाहतूककोंडी सोडविता आली नाही. वयस्कर झाल्याने त्यांनी पोरकटपणासारखं वागू नये, अशी टीका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केली.
नारायणगाव बाह्यवळण रस्त्यांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज (दि. १७) नारायणगाव-वारूळवाडी येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे व प्रकल्पबाधित शेतकरी बाळासाहेब पाटे, आशिष वाजगे, दशरथ शेटे, किसन खैरे, मारुती भूमकर, सीताराम निंबाळकर, खंडू भुजबळ, साहेबराव काळे आदींच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. या वेळी बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, जि. प. सदस्य आशा बुचके ,पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे, गणपतराव फुलवडे, तहसीलदार हनमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, दिलीप मेदगे, विकास दरेकर, अनिल मेहेर, तुळशीराम भोईर, बाळासाहेब खिलारी, संतोष खैरे, सरपंच राजेश मेहेर, बाळासाहेब पाटे, अशोक घोडके, रज्जाक कुरेशी, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, राहुल गावडे, राजश्री बोरकर ,सुजाता डोंगरे ,पुष्पा खैरे ,वैजयंती कोऱ्हाळे ,संगीता काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .
आढळराव पाटील यांनी शुक्रवारी केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाचा समाचार घेताना खा. कोल्हे म्हणाले की , बाह्यवळण रस्त्याची वर्कऑर्डर १९ जुलै २०१९ रोजी निघाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष योगदानातून बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. दोन वर्षांत बाह्यवळणासाठी १ हजार कोटीचा निधी आणला. चाकण येथे साडेसहा कोटींचा फ्लायओव्हर होणार आहे. पुढील वर्षी जून २०२२ पर्यंत कळंब, मंचर, खेड, आळेफाटा ही सर्व बाह्यवळणाची कामे पूर्ण होतील. आमदार अतुल बेनके म्हणाले की, बाह्यवळणातील शेतकऱ्यांचे काही प्रलंबित प्रश्न सोडविले जाईल. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही पदावर आहोत. सेमी हायस्पीड रेल्वे सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न सुरु आहे सभापती संजय काळे म्हणाले की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार हे खासदार अमोल कोल्हे ,आमदार अतुल बेनके व आम्हाला चोर म्हणतात, वास्तविक माजी आमदार हेच महाचोर आहेत.
आशा बुचके म्हणाल्या की, बाह्यवळणामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून अनेक त्रुटी दूर कराव्यात. काही ठिकाणी लाईटचे पोल उभारणी योग्य पद्धतीने झाली नाही. राजकारणात एकमेकांवर शिंतोडे उडविणे योग्य नाही. एकमेकांचा सन्मान सर्वांनी राखावा.
या वेळी दिलीप मेदगे, आशा बुचके, गणपतराव फुलवडे, अनंतराव चौगुले यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन भाऊ देवाडे व मुकेश वाजगे यांनी केले. प्रास्तविक पांडुरंग पवार यांनी केले. सरपंच राजेंद्र मेहेर यांनी आभार मानले.
फोटो - नारायणगाव बाह्यवळण रस्त्यांचे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे.