पुणे : नामवंत सराफाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी अगोदर चार जणांना अटक केली आहे. आशिष हरिश्चंद्र पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केट यार्ड) व संदेश वाडेकर (वय ३३, रा. चिखली) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी त्याच्यासोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्या वतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करून दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. त्यावरून बांदल यांना मागील गुरुवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी सलग तीन दिवस बांदल यांची चौकशी करण्यात आली. बांदल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.अन्य आरोपींकडून मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी बांदल यांना आज शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावले होते. काही वेळ त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बांदल यांच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाला ५० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 9:13 PM