लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : नारायणगाव येथील जमीन खरेदी-विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील प्रमुख सूत्रधार माजी पंचायत समिती सदस्य आणि नारायणगाव ग्रामपंचायतीवर २३ वर्षे वर्चस्व असलेले चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नारायणगाव पोलिसांनी कोऱ्हाळे याला अटक केली आहे. त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
या कटात नारायणगाव येथील साबीर पतसंस्थेचा मॅनेजर प्रशांत माने याचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच संग्राम घोडेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिन्ही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसाची पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८)अटक केली आहे. दुसरा सूत्रधार प्रशांत माने, हल्लेखोर सोन्या राठोड (वय २४), साहिल शेख (वय १८, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), भावेश लेंडे (रा. पिंपळवंडी) हे तिघे फरार आहेत.
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार: जमीन खरेदी-विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी गुरुवारी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यानंतर ते फरार झाले होते. पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळलेल्या माहितीनुसार तसेच कोल्हेमळा रस्ता आणि आळेफाटा रस्त्यावरील सीसीटीव्हीचे चित्रण मिळवून तत्काळ तपासाची सूत्रे फिरवली. घोडेकर यांची पत्नी रत्नमाला घोडेकर यांनी फिर्याद दिल्यानंतर अवघ्या ६ तासात आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला. हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे आणि प्रशांत माने याने संग्राम जगन्नाथ घोडेकर यांना जिवे मारण्याचा कट केला. त्यासाठी त्यांनी सोन्या राठोड, साहिल शेख, भावेश लेंडे यांना प्रॉपर्टी आणि रोख रक्कमेचा आमिष दिले. त्यानुसार वरील तिघांनी दुचाकीवरून येऊन गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर हल्ल्याची जबाबदारी अल्पवयीन मुलावर देऊन त्यांना त्यांना लगेच बाहेर काढण्याचा प्लॅनही कोऱ्हाळे याने केला होता, अशी माहिती गुंड यांनी दिली. हा हल्ला मधुकोश सोसायटीतील रो-हाऊस आणि आर्थिक देण्याघेण्यावरून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे पाटील हे करीत आहेत.