पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.
महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अजितदादांनी शपथ घेतल्यावर बारामतीत तर फटके वाजवून जल्लोष करण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते अजित पवारांबरोबर असल्याचे दिसून आले आहे. अशातच पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनीसुद्धा अजितदादांची मुंबई येथे भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी काटे हे मताधिक्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिकीट देण्यात आले होते. नाना काटे अजित पवारांच्या जवळचे असल्याचीही पिंपरीत चर्चा आहे. कालच्या घडामोडीनंतर नाना काटे यांनी कार्यकर्त्यांसमेवत मुंबईला जाऊन अजित पवारांचे अभिनंदन केले आहे.
बारामतीकरांनी फटाक्यांची केली आतिषबाजी
अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला होता. सुरवातीला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर पक्ष कार्यालय परीसरात सन्नाटा पसरला होता. मात्र,नागरीकांना या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.फटाक्यांची आतिषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. सुमारे अर्ध्या तासाुिन अधिक काळ सुरु असणाऱ्या फटाक्यांची फटकेबाजी अद्याप सुरुच आहे. अजितदादांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आम्हा बारामतीकरांनी मोठा आनंद झाला आहे. दादा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे बारामतीच नव्हे पुर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. सर्वांचा विकास होईल. दादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील,तो पक्ष मोठा होऊन वाढेल. आम्ही अजितदादांबरोबर आहोत असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सांगितले.