पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला.‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा पुरस्कार मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला प्रदान करण्यात येतो. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साेहळ्याला मेक्सिकाेच्या राजदूत सेन्यूया मेलबा प्रिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मेक्सिकाे देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्यात येताे. यापूर्वी डॉ. नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, बिल गेट्स या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पाटील या देशाच्या राष्ट्रपती असतांना सन 2007 मध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्यांच्या निमंत्रणावरुन पाटील यांनी 2008 मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पाटील म्हणाल्या की, 'मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मेक्सिको सरकारचे आभार मानते. हा पुरस्कार माझा नाही तर माझ्या भारत देशाचा आहे. यावेळी त्यांनी मॅक्सिकोला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मॅक्सिकोसाठी पहिल्या भारताच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांचा आवर्जून उल्लेख केला. स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिलेल्या पंडित यांची जवाहरलाल नेहरू यांनी मेक्सिकोच्या राजदूतपदी निवड केली आणि तेव्हापासून या दोनही देशांचे ऋणानुबंध जुळले आहेत.यावेळी पाटील यांनी चरखा देत मेक्सिको सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली'.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 3:49 PM