पुणे : नेस वाडिया कॉलेजचे माजी प्राचार्य, संस्कृतचे गाढे अभ्यासक, लेखक वसंत कृष्ण नूलकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (दि.१) रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रा. गुरुदास नूलकर, सून व नातवंडे असा परिवार आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त आणि आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अशा महत्त्वांच्या पदांवर त्यांनी काम केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी उच्च शिक्षण घेऊन नेस वाडिया कॉलेजमध्ये कारकीर्द सुरू केली. त्यानंतर मरकळ येथे केशवराज शिक्षण संस्था सुरू केली. अक्कलकोट येथील स्वामी मठाचे विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांनी ललिता त्रिशती, शिशुपाल वध, सनत सुजातीय सूत्र, अध्यात्म पटल, रघुवंश या संस्कृत ग्रंथांचे मराठीत सटीक रूपांतर केले आहे.