लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील झोंबाडे कुटुंबावर अन्याय व अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या खटल्यातील मुख्य आरोपी तसेच मेदनकरवाडीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य रामदास मुरलीधर मेदनकर व त्यांचा मुलगा संकेत रामदास मेदनकर यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मेदनकर पिता-पुत्र गावातून फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.
उच्च न्यायालयात हा खटला सुरू आहे. दोघांना गाव बंदीचा आदेश असताना गावाच्या यात्रेत सहभाग घेणे, रात्री-अपरात्री चोरून घरात येणे, घरातील व परिसरातील सीसीटीव्ही दोन वर्षापासून बंद ठेवणे, मेदनकरवाडी येथील सरपंच, उपसरपंच निवडणुकीत खुला सहभाग घेणे, हे सर्व प्रकार करून त्यांनी गावबंदी आदेशाचा अवमान केला आहे. या सर्व बाबी झोंबाडे कुटुंबाने वेळोवेळी चाकण पोलीस ठाण्यात लेखी व तोंडी निदर्शनास आणून दिल्या. उच्च न्यायालया समोर सरकारच्या वतीने पुरावाही हजर केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करून आरोपींना अटक करण्याचा आदेश काढला आहे.