लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज येथील गुजरवाडीमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उघडकीस आणला असून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
विकास रमेश चव्हाण (वय ३१, रा. गुजरवाडी, कात्रज) आणि सचिन जालिंदर डाकले (वय २९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी मोहन चौंडकर (वय ३२, रा. खलाटेनगर, मांगडेवाडी) यांचा खुन केला होता. विकास चव्हाण हा हवेली तालुक्यातील पेंजर गावाचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. मोहन चौंडकर हा ग्रामपंचायत सदस्याच्या मामीचा सख्खा भाऊ होता. या प्रकरणी मोहन चौंडकर याची पत्नी पूजा हिने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मोहन चौंडकर यांच्या डोक्यात विटा आणि दगड मारुन खून करण्यात आला होता.
विकास चव्हाण याने मोहन चौंडकर यांना खलाटेनगर येथे एक गुंठा जमीन घेऊन दिली होती. विकास याने तेथे लाईट व इतर सुविधा उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. परंतु, ते ती उपलब्ध करुन देऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शेजारुन मोहन यांना लाईट व पाण्याचे कनेक्शन घेऊन दिले होते.
विकास याच्या मित्राने मोहन यांच्या शेजारीच जमीन घेतली होती. तेथे बांधकाम सुरु होते. विकास चव्हाण, सचिन डाकले व मोहन चौंडकर हे १८ मे रोजी रात्री दारू पित बसले होते. यावेळी मोहन याने त्याला लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन न दिल्याचा विषय काढला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा विकास व सचिन यांनी शिवीगाळ करुन मोहन यांस बांधकाम साईटवरील विटांनी मारहाण करुन खुन केला व ते पळून गेले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यावर, भारती विद्यापीठ पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत होती. खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस नाईक संजय भापकर यांना आरोपी हे शिरवळ येथे निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शिरवळ फाटा येथे गेले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे व सहकारी यांनी केली.