पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण दिवसेंदिवस वाढत असून आता ते २०१८ च्या परीक्षेपर्यंत पोहचले आहे. २०१८ मध्ये राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेला व माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचा विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पेपर गैरव्यवहार प्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या ५ झाली आहे.
सुखदेव डेरे हा २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचा आयुक्त होता. २०१८ च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रीशीत देशमुख याच्या अगोदर जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्याकडे होती. त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याचे माहिती समोर आली आहे.
यावरुन जी. ए. सॉफ्टवेअरमध्ये प्रीतीश देशमुख याच्या अगोदरही तेथील संचालक हे वरिष्ठांशी संगनमत साधून परीक्षेमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी २०१६ पासून झालेल्या सर्व टीईटी परीक्षांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा प्रकार समोर आला.