पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी कोषाध्यक्ष दानचंद घिसुलाल ऊर्फ डी. जी. बर्डे (वय ७७) यांचे सोमवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. सुप्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत हे त्यांचे जावई होत.
बर्डे मूळचे कोल्हापूरच्या जयसिंगपूरचे तंबाखूचे व्यापारी. विवाहानंतर ते पुण्यात स्थायिक झाले व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख होती. परंतु, ते नेहमीच उपेक्षित राहिले. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर त्यांची अल्पकाळ नियुक्ती झाली होती. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत सृजन फाउंडेशनचे ते उपाध्यक्ष होते.
सत्तरच्या दशकात ते काँग्रेसमधील प्रभावी नेते होते. इंदिरा गांधी, संजय गांधी यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांचा दबदबा होता. नवी दिल्ली तसेच देशभरातील दिग्गज काँग्रेस नेत्याबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार उल्हास पवार यांच्या समवेत ते सावलीप्रमाणे वावरले. संजय व इंदिरा गांधींच्या निधनानंतर ते महाराष्ट्रातच राहिले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही ते निकटवर्तीय होते. प्रदेश काँग्रेसमध्ये ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता व मी एक जिवलग मित्र गमावला आहे, अशा शब्दांत माजी आमदार उल्हास पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
फोटो - डी. जी. बर्डे