अंकुश जगताप, पिंपरीविरोध न करणाऱ्यांची परंपरा खंडित झाल्याने प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागांवर सरशी मिळविली आहे. येथे सर्वपक्षीय राजकारणाचे सूत्र मांडल्याने विरोधकांच्या प्रचारातील धारच कमी झाल्याने पॅनलला यश आले आहे, तर विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या रूपाने सहकाराच्या राजकारणात मुरलेल्या जुन्या पैलवानाने नवख्यांना धोबीपछाड दाखविल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे कारखाना उभारणीपासूनच नवलेंबद्दल थेट विरोध टाळण्याचा प्रयत्न झाला आहे. कारखान्याच्या हितासाठी नवलेंनीही आजवर सर्वसमावेशक भूमिका घेत थेट वादविवादाला फाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच प्रत्यय या निवडणुकीदरम्यान आला आहे. कारखाना उभारणीपासून गावोगावी फिरून सभासद मिळविणे, भागभांडवल जमा करणे यासाठी नवले व त्यांच्या समवयस्क जोडीदारांनी, सहकाऱ्यांनी कष्ट घेतले होते. आजवर १७ हजारांवर सभासद असलेल्या या कारखान्याचा आवाका मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यांमध्ये पसरला आहे. त्यातच मुबलक पाऊस, धरणांचा भाग व पाण्याची उपलब्धता यामुळे या तालुक्यांच्या कारखाना झाल्यापासून बहुतांश डोंगराळ भागातही उसाची शेती बहरली. त्यातच पंचक्रोशीत आजवर त्यांनी जपलेले समर्थक व असणारे दांडगे नातेसंबंध यांचे पाठबळ नवलेंच्या पाठी होतेच. या जोरावर ते निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र अनेक उमेदवारांनी मुदत संपल्यानंतरही अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक जाहीर झाली. ६३ उमेदवार रिंगणात उतरले. त्यात बाळासाहेब नेवाळे यांच्या परिवर्तन पॅनलचे १७ जण तगडे आव्हान देतील, असे चित्र होते. मात्र पट्टीचे अनुभवी असलेले नवले यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी परिवर्तन शेतकरी पॅनलला अस्मान दाखवीत सहकाऱ्यांसह रणनीती आखत आपल्या पॅनलला विजयश्री मिळवून दिली आहे. खुद्द नवले यांनी ८ हजार ३२० मते मिळवून लोकप्रियता सिद्ध केली आहे.
सर्वपक्षीय राजकारणाचे सूत्र आले कामी
By admin | Published: April 06, 2015 5:35 AM