पुणे : पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत दिले. या बहुमताचा वापर पुणेकरांच्या कल्याणासाठी, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणे अपेक्षित होते. पण तसे न करता अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर.आली आहे. मात्र, हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याने आम्हाला त्याचे काही देणे-घेणे नाही. मात्र, या कलहातून प्रशासनाची नालस्ती करून प्रशासनाला पर्यायाने पुणेकरांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे. हे म्हणजे भाजपची बाहेरून 'दोस्ती' आणि आतून ‘कुस्ती’ अन् प्रशासनाची नालस्ती असेच चित्र सध्या आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
‘पीएमपी’चे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात घुसुन संगणकात केलेली छेडछाड असो वा तेथील कर्मचाऱ्यांना दिलेली धमकी असो, यातून सुसंस्कृत असलेल्या आपल्या पुण्यात ‘सुसंस्कृत’ म्हणवल्या जाणाऱ्या पक्षाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दादागिरीचा ‘पॅटर्न’ राबविण्यात येत आहे. हे पुणेकरांसाठी नक्कीच दुर्दैवी आहे अशा शब्दात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निशाणा साधला आहे.
जगताप म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात आगमन झाल्यापासून हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. पाटील हे पुण्यात आल्यापासून त्यांनी ‘बाहेरून दोस्ती, आतून कुस्ती’ असा फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली आहे. असून, त्यामुळे विविध गटांत भांडणे लागली आहेत. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न केवळ पक्षापुरता मर्यादित न राहता, हा कलह रोज खुलेपणाने जनतेसमोर येत आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर या नेत्यांनी पक्षात काहीही कुरघोड्या केल्या तरी आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही.
चांगल्या अधिकाऱ्यांची बदनामी करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. एकमेकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून दुसऱ्यांवर गोळी मारण्याचा हा प्रकार असून, त्यामुळे प्रशासनाचे पर्यायाने पुणेकरांचे नुकसान होत आहे. भाजपची ही दादागिरी पुणेकर कदापि स्वीकारणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपकडून सुरू असलेले सर्व खोटे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असेही जगताप यांनी केली आहे.