पुणे : पुण्यातील आठ मावळ्यांनी मुळशी तालुक्यातील ‘नवरा’ हा दोनशे फुटांचा अत्यंत अवघड सुळका सर करण्याची कामगिरी केली. नवीन वाट निर्माण करीत दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दुर्गप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांना सुळका सर करण्यात यश आले. तैलबैला, घनगड या परिसरातील भांबुर्डे नवरा हा सुळका गेल्या आठ-दहा वर्षांत कोणी सर केला नसल्याची माहिती गिर्यारोहकांना मिळाली होती. त्यामुळे शिवप्रतापदिनी (१० नोव्हेंबर) हा सुळका सर करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. दुर्गप्रेमींचे १७ शिलेदार ८ नोव्हेंबरला दुपारी चार वाजता भांबुर्डे गावात पोहचले. पहिल्या दिवशी चढाईच्या मार्गावर पहिला बोल्ट बसविणे शक्य झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला पहाटे पाच वाजता सर्व सुळक्याकडे रवाना झाले. चढाईचा या पूर्वीचा मार्ग पूर्णपणे ढासळून गेल्यामुळे नवीन मार्ग तयार करावा लागला. हा मार्ग करताना ठिसूळ दगड व काही ठिकाणी असलेल्या काळ्या पाषाणाचा अडसर होता. प्रत्येक ठिकाणी हॅन्डड्रिल आणि हातोडीच्या साह्याने बोल्ट, पिटोन, मेखा माराव्या लागत होत्या. अक्षरश: इंच इंच जागा पुढे सरकावी लागत होती. दुसºया दिवशी सदस्य थकल्याने संस्थेचे अध्यक्ष सुनील पिसाळ यांनी बॅटरी ड्रिलमशिन मागवण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी दीपक झुरुंगे व अनिकेत बोकील बॅटरी ड्रिल घेऊन रात्री एकपर्यंत बेस कॅम्पला हजर झाले. त्यानंतर १० नोव्हेंबरला ताज्या दमाच्या अनिकेतने दिवसाची सुरुवात केली. बॅटरी ड्रिलच्या साहाय्याने दोन बोल्ट व एक पिटोन मारून चांगली सुरुवात करून दिली. नंतर धनराज व धनंजय यांनी निसरड्या आणि खड्या चढाईवर निसरडे गवत, ठिसूळ दगड व झाडेझुडूपे या सगळ्यांवर मात करत दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुळका सर केला.मोहिमेचे नेतृत्व धनंजय सपकाळ यांनी केले. तांत्रिक जबाबदारी धनराज पिसाळ यांनी पार पडली. युवराज किनिंगे, सद्गुरू काटकर, अनिकेत बोकील, सुनील पिसाळ, रवींद्र गायकवाड, रमेश वैद्य, हृषीकेश चिंचोले, दत्ता लोंढे, तानाजी जाधव, संदीप जाधव, धनंजय गुप्ता, श्रीनाथ शिंदे, हेमंत रामटेके, राजेंद्र चव्हाण, सुनील काकडे, दीपक झुरुंगे व गणेश पठारे यात सहभागी झाले होते..............असे जाता येईल ‘नवरा’ सुळक्यावरपुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यातील भांबुर्डे गावाजवळ नवरा, नवरी आणि करवली हे तीन सुळके आहेत. अॅम्बी व्हॅली व ताम्हिणी मार्गे येथे जाता येते. या सुळक्यांच्या आकारावरून त्यांना ही नावे पडली आहेत.
पुण्यातील दुर्गप्रेमींनी सर केला ‘भांबुर्डे नवरा’ सुळका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 1:11 PM
दोनशे फुटांचा अत्यंत अवघड सुळक्यावर दोन दिवसांत केली यशस्वी मोहीम
ठळक मुद्देनव्या मार्गाने चढाई : मुळशी तालुक्यातील भांबुर्डे गावाजवळ नवरा, नवरी आणि करवली हे तीन सुळके