लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : किल्ले शिवनेरीवर शुक्रवारी होणाऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवाच्या प्रमुख शासकीय कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काही मंत्रिगण यांचे सकाळी ९ वाजता शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. शिवजन्मस्थळ इमारतीत पारंपरिक शिवजन्म सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व मान्यवर शिवकुंज स्मारकात राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या शिल्पास अभिवादन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी केवळ १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग व महसूल विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवजन्मस्थान इमारत तसेच किल्ल्याकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शिवजयंतीच्या मुख्य शासकीय सोहळ्यासाठी अवघ्या शंभर जणांच्या उपस्थित करण्याचे महसूल व पोलीस प्रशासनाचे नियोजन आहे. निवडक मान्यवर राजकीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील मुलांचे लेझीम पथकदेखील आपली कला दाखविणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती या सोहळ्यासाठी शिवप्रेमी नागरिकांना शिवनेरीवर प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी प्रवेशपत्र असल्याशिवाय कोणालाही शिवनेरी गडावर प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी (दि.१८) सायंकाळ पर्यंत पाच जणांच्या गटाला शिवनेरीवर सोडण्यात येत होते. राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमीना शिवजयंती सोहळा पाहता यावा म्हणून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा गडाच्या पायथ्याशी करण्यात येणार आहे. शासकीय सोहळा समाप्त झाल्यानंतर सर्व शिवप्रेमींना गडावर प्रवेश दिला जाणार आहे.
चौकट
किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हॉटेल रतनच्या बाहेर असलेल्या आय लव्ह शिवजन्मभुमी या सेल्फी पॉइंटवर युवा शिवभक्तांनी छायाचित्र, सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. सोहळा शांततेत पार पाडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मराठा सेवा संघ, संत तुकाराम वाचनालय, मंदार बुट्टे पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घरात साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या चित्रफितीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
फोटो : ‘आय लव्ह शिवजन्मभूमी’ या सेल्फी पॉइंटवर छायाचित्र, सेल्फी काढण्यासाठी जमलेले युवा शिवभक्त.