मार्गासनी : स्वराज्याचे पहिले तोरण किल्ले तोरणा गड पुन्हा अंधारात आला असून वनविभागाचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे. सरकारच्या प्रयत्नातून काही दिवसांपूर्वी तोरणा गडावरवीज आली आणि गड प्रकाशमान झाला. मात्र काही दिवसांतच शासनाच्या वन विभागाला तोरणागडावर गेलेल्या विजेचे खांब वन विभागाच्या हद्दीतून गेल्याने वन विभागाने महावितरणने पूर्ण केलेल्या या कामावर आक्षेप घेतल्याने प्रकाशमय झालेल्या तोरणागडावर पुन्हा अंधार झाला आहे.
महावितरण व वनविभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने सदर परिस्थिती ओढावली असल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. किल्ले तोरणा स्वराज्याचे पाहिले तोरण, किल्ले तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे ,लाखो शिवप्रेमींचे श्रध्दास्थान या किल्ल्यावर शिवप्रेमी व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. गडावर जाणारा मार्ग व किल्ला प्रकाशमान होण्यासाठी अनेक शिवप्रेमींची मागणी होती त्यानुसार दोन वर्षांपूर्वी गड विद्युतीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. अगदी मागच्या महिन्यापर्यंत तोरणागड अंधारात होता या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता या कामामध्ये ११ केव्हीच्या वाहिनीसाठी २७ विजेचे खांब तर लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले. तर १८०० मीटर लांबीची भूमिगत विजवाहिनी दर्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तर १०० केव्हिए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी घाटमाथ्यावर डोंगरदऱ्या तुन खांद्यावर विजेचे खांब व इतर साहित्याची वाहतूक केली होती.
काम पूर्ण झाले दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वेल्हे दौऱ्यावर असताना मंगळवार ता.३० नोव्हेंबर २०२१ रोजी गडावरील विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते व तोरणागड प्रकाशमान झाला . यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालकासहीत सर्व अधिकारी उपस्थित होते .परंतु असे असताना वनविभागास उद्घाटनानंतर काही दिवसांनी उपरती झाली असून हा विजेचा पुरवठा झालेल्या काही भागामध्ये वनविभागाची हद्द असल्याचे उशिरा निदर्शनास आले व कामावर हरकत घेत यांनी सदरचा विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दिवा पेटला नसून किल्ले तोरणा अंधारात आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य ,व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी किल्ला अंधारात असल्याकडे लक्ष वेधले असून याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य,राष्ट्रवादीचे सरचिटणीस आनंद देशमाने ,माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष विकास नलावडे, सुनील राऊत, अंकुश पासलकर, राजू पांगारे, आदी उपस्थित होते.