दीपक कुलकर्णी-
पुणे : टिक टॉक व्हिडिओ , वेबसिरीज यांसारख्या माध्यमांची आपल्या आयुष्यात रोज नव्याने इनकमिंग सुरु आहे. सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन असल्याने या माध्यमांची क्रेझ सर्वत्र आहे. परंतु, फक्त मनोरंजन म्हणून या नवीन माध्यमांकडे न बघता इंदापूरच्या सोमनाथ जगताप आणि प्रशांत गाडेकर या दोन तरुणांनी ' सफर स्वराज्या' ची या ट्रॅव्हल सिरीज च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या वैभवशाली गडकिल्यांची माहिती ' दृश्य ' स्वरूपात सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी एक स्तुत्य पाऊल टाकले आहे... इतिहास हा घरात बसून किंवा वर्गात बसून शिकण्याचा वा आनंद घेण्याचा विषय नाही.पण प्रत्येकालाच ते शक्य होईल असेही नाही. त्यामुळे जो तो ऐतिहासिक पुस्तके, चित्रपट , मालिका, नाटके, व्याख्याने यांमधून शिवरायांच्या गडकिल्ल्यांची यशोगाथा, महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु, इंदापूरचे या दोन मित्रांनी यापुढे एक पाऊल टाकत महाराष्ट्रातील स्वराज्याशी संबंधित अथवा दुर्लक्षित अशा प्रत्येक गडकिल्ल्यांची पार्श्वभूमी, तिथपर्यंत पोहचण्याचा प्रवास, ट्रेकिंग, तेथील नाविन्यपूर्ण गोष्टी, अशी सर्व माहिती ' सफर स्वराज्याची ' या ट्रॅव्हल सिरीज च्या माध्यमातून दृश्य स्वरूपात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.आत्तापर्यंत ते ६ गडांवर पोहचले आहे. या मोहिमेचा श्रीगणेशा त्यांनी सप्टेंबर महिन्यात पुण्याजवळील तोरणा गडापासून केला. त्यानंतर कर्जतजवळ असलेला कोथळीगड (पेठचा किल्ला), पेब (विकटगड),विशाळगड, रायरेश्वर, सहावा गड उस्मानाबाद जिल्ह्यातील भुईकोट प्रकारातील परांडा अशा किल्ल्यांचा समावेश आहे. यापुढे ही मंडळी 'नाईट ट्रेकींग' सुध्दा करणार विचार असून त्यात हरिश्चंद्रगड, राजगड, हरिहरगड, लोहगड आणि साल्हेर हे असणार आहे. तसेच दिवसा रायगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, वासोटा, शिवनेरी, सिंहगड, पुरंदर ह्या किल्ल्यांवर दिवसा ट्रेक करणार आहेत. प्रत्येक किल्ल्यासंबंधित एक किंवा दोन भागात ते माहितीपट तयार करत आहेत. आणि पंधरा दिवसाला एक असे महिन्याला दोन माहितीपट प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा त्यांचा मानस आहे. साधारण १५ ते वीस मिनिटांच्या आतला हा माहितीपट असणार आहे. या संदर्भात सोमनाथ जगताप हा तरुण म्हणाला, 'ग्रीनवूड क्रिएशन' या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरती सफर स्वराज्याची (एका नव्या पर्वाची सुरुवात..) ही मराठी ट्रॅव्हल सिरीज सुरू केली आहे.या सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रसह जगभरातील पर्यटकांना व ट्रेकर्स मंडळीना त्याचप्रमाणे सामान्य लोकांना शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती घर बसल्या भेटावी तसेच कधी भेट देण्याचा विचार आला तर जाणे त्रासदायक न होता सोपे व्हावे या उद्देशानेच हा उपक्रम सुरू केलेला आहे. राज्याच्या विविध भागांतून गडकिल्ल्यांवर ट्रेक करण्याची इच्छा असणारे अनेक तरुण मंडळी हा उपक्रम सुरू केल्यापासून आमच्याशी जोडली जात आहेत. .............................आपल्याकडे अशी काही मंडळी आहेत. ज्यांना ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर भटकंती करायची तीव्र इच्छा असते. पण त्यांना शारीरिक व्याधींमुळे तसेच व्यवसाय, नोकरी, शिक्षण,परदेशातील वास्तव्य अशा एक ना अनेक अडचणींमुळे तिथे जाता येत नाही अशा मंडळींना आमच्या सफर स्वराज्याची या ट्रॅव्हल सीरिजच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांच्या भेटीचा सर्वतोपरी आनंद घेता येईल. तसेच ज्या कोणाला या गड किल्ल्यांवर जायचे आहे त्यांना मार्गदर्शक म्हणून ही सिरीज काम करेल. - प्रशांत गाडेकर, सफर स्वराज्याची ..........................राजा शिव छत्रपती हे पुस्तक वाचण्याचा योग आला आणि तिथूनच महाराजांचे गडकिल्ले मला खुणावू लागले. पुढे काही केल्या गडकिल्ल्यांचा विचार डोक्यातून जात नव्हता. त्यातूनच सफर स्वराज्याची या ट्रॅव्हल सिरीजची निर्मिती झाली. प्रत्येक आव्हानांवर मात करत या सिरीजमध्ये आत्तापर्यंत ६ किल्ल्यांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यातील तोरणा किल्ल्याचा पहिला भाग युट्युबवर ' ग्रीन वर्ल्ड क्रिएशन ' या चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे. पुढे या ट्रॅव्हल सिरीजमध्ये जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या जलदुर्गांचा देखील समावेश असणार आहेत. सोमनाथ जगताप, सफर स्वराज्याची, संंस्थापक.