शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपूजेचे हे २४ वे वर्ष आहे. या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतातील १४० व भारताबाहेरील २ आशा १४२ गड-किल्ल्यांवर एकाचवेळी शिवप्रेमी, विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्गपूजा करण्यात आली.
शिवाजी ट्रेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर व विश्वस्त विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर व सुवर्णा तोडकर, मंचर येथील कांदा- बटाटा व्यापारी शांताराम थोरात व संगीता थोरात, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पडवळ व उज्ज्वला पडवळ यांच्या हस्ते भोरगिरी किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात ही ऐतिहासिक दुर्गपूजा पार झाली.
या वेळी शिवभक्त रविराज थोरात, प्रा. अश्विनी गायकवाड, सुमेध थोरात, श्रेयस पडवळ यांसह शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते.
दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी, सर्वसामान्य नागरिक व शिवभक्त गड-किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत, प्रत्येक्ष गड-किल्ल्यांवर उपस्थित राहावेत, त्यांना गड-किल्ले पाहण्याची व त्यातून नंतर त्यांच्यात दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने दर वर्षी दुर्गपूजेचा उपक्रम राबविण्यात येतो. साधारणपणे जानेवारी महिन्यात गड-किल्ल्यांवरील गवत सुखण्यास सुरुवात होते. तर फेब्रुवारी महिन्यात गवत पूर्ण सुखून जाते. किल्ल्यांवरील गवत सुखल्यामुळे दुर्ग संवर्धनाची कामे करणे सोपे जाते. त्यामुळे शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वत्र दुर्गपूजा करून गड-किल्ल्यांवरील दुर्गसंवर्धन कामास सुरवात केली जाते, अशी माहिती यावेळी शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.
फोटो ओळ: भोरगिरी (ता. खेड) येथील किल्ल्यावर दुर्गपूजा करण्यात आली.