पुणे : पुणेकरांसाठी एक गोष्ट अत्यंत अभिमान व गौरवाची राहिली आहे ती म्हणजे लाभलेला ऐतिहासिक ठेवा.पुणे जिल्ह्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, शिवनेरी राजमाची, रायरेश्वर यासारख्या गड किल्ल्यांनी पुण्याच्या वैभवात मोलाची भर टाकली आहे. या गडकोटांनी पर्यटक आणि ट्रेकर्सला नेहमीच भुरळ घातली आहे. परंतु, कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून राज्यातील गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. मात्र आता अनलॉकमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणताना गड किल्ल्यांसह ऐतिहासिक स्थळे पर्यटनाला खुली करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, गड , किल्ले पर्यटनासाठी सुरु करण्याबाबतचा आदेश नुकताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. मात्र पर्यटनाला परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत आवश्यक सर्व काळजी व नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
नेहमीच भटकंती, पर्यटन, ट्रेकिंग याला पसंती देणाऱ्या पुणेकरांना कोरोनाकाळात आपल्या लाडक्या गड किल्ल्यांपासून दूर राहावे लागले. तसेच गड, किल्ले, येथे पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यवसाय करणारी कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मात्र इतिहासप्रेमींसह या सर्व व्यावसायिक कुटुंबाना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. मोठ्या कालावधीनंतर गड किल्ल्यांवर पर्यटकांची गजबज दिसणार आहे. यामुळे आनंद द्विगुणित झाला आला तरी कोरोना संकट अजून संपलेले नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असणार आहे.
पुणेकरांसाठी नेहमीच 'फेव्हरेट' असलेला सिंहगड पुण्यापासून अगदी जवळ असलेला सिंहगड पुणेकर व पर्यटकांचा नेहमीच फेव्हरेट राहिला आहे. शनिवार , रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळत असते. येथील झुणका , पिठलं भाकरी, कांदाभजी, मातीच्या भांड्यातील दही, वांग्याची भाजी पर्यटकांची आकर्षणच केंद्रबिंदू राहिला आहे. मागील वर्षी आलेल्या 'तान्हाजी' सिनेमापासून तर सिंहगडावर मोठी गर्दी वाढली आहे.