जुन्नर : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्रातील सर्व गडकोट किल्ल्यांची संपूर्ण माहिती असणाऱ्या प्रतिकृतींचे संग्रहालय असणे आवश्यक आहे. तसेच, शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास हा स्वतंत्र विषय ठेवणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.किल्ले शिवनेरीवर शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिवजयंती महोत्सवाचे हे ३८वे वर्ष आहे.शिवनेरीची गडदेवता शिवाई मातेला सकाळी पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते पूजा-अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बालशिवबांच्या पुतळ्याची पालखीतून शिवाई मातेच्या मंदिरापासून शिवजन्मस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शिवजन्मस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा झाला. बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक असलेल्या शिवकुंज इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले. शिवकुंज स्मारकात झालेल्या धर्मसभेत शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांचा मर्दानी पोवाडे गायनाचा कार्यक्रम झाला. शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, शहरप्रमुख अविनाश करडिले, रमेश खत्री, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे, टेकाळेमहाराज, बाबासाहेब सरजिने या वेळी उपस्थित होते.शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे बळकटीकरण करणाऱ्या सावरगाव येथील पूनम मनसुख यांना पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाहीर हेमंत मावळे म्हणाले, ‘‘शिवजन्मभूमी शिवनेरी हा प्रेरणास्रोत आहे. देशाच्या जडणघडणीची प्रेरणा घेण्यासाठी किमान शिवजयंतीला एक दिवस शिवनेरीवर आले पाहिजे.शिवनेरीवर किल्ले शिवनेरीवरून शिवज्योती घेऊन जाण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शिवप्रेमींची रात्रीपासूनच गडावर गर्दी झाली होती. सूर्या ग्रुपच्या वतीने शिवज्योत नेणाऱ्या शिवभक्तांसाठी अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले. (वार्ताहर)
किल्ल्यांबाबत प्रतिकृतींचे संग्रहालय हवे
By admin | Published: March 17, 2017 1:44 AM