लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात इच्छा असूनही बाहेर जाता येत नव्हते, आप्तेष्टांना, मित्र मंडळीना भेटता येत नव्हते, लहान मोठ्या सर्वांनाच सक्तीने घरात राहावे लागत होते. अशा परिस्थितीत नात्यांमधील दुरावा, एकटेपणाची भीती, आर्थिक संकटांचा करावा लागणारा सामना अशा विविध ताणतणावांना सर्वांना सामोरे जावे लागले. अशा वेळी निराश न होता कलेच्या माध्यमातून या सगळ्यावर मात करण्यासाठी प्रसिद्ध कथक नर्तक मुल्ला अफसर खान यांनी ‘रियाज कोरोना-रियाज विथ मी’ ही संकल्पना घेऊन ‘चिल्ला रियाज’ पूर्ण केला.
‘चिल्ला’ हा फारसी आणि अरेबिक भाषेतून आलेला शब्द. त्याचा अर्थ चाळीस. सलग चाळीस दिवस, सलग सोळा ते अठरा तास रियाज म्हणजे चिल्ला! ज्या कलेत पारंगत व्हायचे आहे त्यासाठी मन एकाग्र करून चाळीस दिवस बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून बंदिस्त खोलीत केलेल्या रियाजाला ‘चिल्ला’ म्हणतात.
मुळचे पुणेरी असलेले खान सिंगापूर येथील सिंगापूर इंडियन फाईन आर्ट सोसायटी (सिफा) येथे कथक शिकवतात. चिल्ला रियाजामुळे आत्मविश्वास एकाग्रता आणि संयम वाढण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात परत विलगीकरणाची वेळ आलीच तर या एकांतवासाचा उपयोग अशा प्रकारच्या रियाजासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. फक्त संगीत, वाद्य, नृत्यच नाही तर कोणत्याही कलेसाठी ‘चिल्ला रियाज’ करता येतो असे मुल्ला अफसर खान यांनी सांगितले.