पुणे: सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून वार्षिक २४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. समीर शौकत इनामदार (शेख) (रा. वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी गणेश बडवे, गौरीहर भागवत आणि रश्मी शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रितेश चंद्रकांत बाबेल (वय ४२, रा. सॅलसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार १३ मार्च २०१७ ते १३ मार्च २०११ दरम्यान घडला आहे. बाबेल यांचा इनामदार यांच्याशी परिचय झाला होता. इनामदार हे ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनवून घेऊन ते विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार बाबेल यांनी सुरुवातीला २५ लाख रुपये दिले. वेळोवेळी पैसे गुंतविले. एकूण ४० लाख व १०० ग्रॅम सोने इनामदारकडे दिले. फिर्यादी यांची मर्सिडीज कार विकायची असल्याचे इनामदार व गौरीहर यांना समजल्यावर त्यांनी ती खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन गाडी व तिची कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना पैसे दिले नाही. खटाव येथील जमीन व वारजे येथील फ्लॅट देण्याचे कबुल केले. फिर्यादीने फ्लॅटची कागदपत्रे पाहिली. तेव्हा ती बनावट असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दिली.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस.बी. जायभाय यांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादीची अलिशान गाडी गणेश बडवे यांना विकली असून त्याबाबतच्या कागदपत्रावर परस्पर सह्या केल्या आहेत. आरोपीने मुंबईतील व्यापार्यास २४ लाख रुपये दिल्याचे तपासात कबुली दिली आहे. तसेच ७ लाख रुपये फिर्यादीच्या खात्यावर जमा केले. समीर व गौरीहर भागवत यांनी फिर्यादीच्या रक्कमेतून वारजे येथील वनिता प्लाझा येथे २ फ्लॅट खरेदी केले आहेत. फिर्यादी यांचे २३०० ग्रॅम सोने आणि अलिशान कारचा अपहार केला आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी समीर इनामदार याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.