पुणे : ठिकाण बेलबाग चाैक... शुक्रवारची रात्र... सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव शिगेला पाेहोचलेला... कसबा पेठेतील गणेश मित्रमंडळाच्या गाेविंदांनी हंडी फाेडायला थर रचला. प्रथमेश कराळे (वय २०, रा. कसबा पेठ) याच्या डाव्या हाती हंडीची दाेरी लागत नाही ताेच मनाेरा ढासळला. पण, कसलेला गाेविंदा प्रथमेश डगमगला नाही. हातात हंडीची दाेरी धरून हंडी फाेडली व त्याच अवस्थेत ताे ४० सेकंद लटकलेला राहिला. त्याला पाहून उपस्थितांचा श्वास राेखला; पण प्रथमेशने सफाइदारपणे उडी मारली अन् त्याला गाेविंदांनी अलगदपणे झेलला.
एखाद्या चित्रपटाला शाेभावा असा दहीहंडी फाेडण्याचा हा थरार हजाराे माेबाईलमध्ये कैद झाला. हा व्हिडिओ सुवर्णयुग मंडळाने इन्स्टाग्रामला टाकला अन् अवघ्या १७ तासांतच त्याला ४० हजार व्ह्यूज आले. प्रथमेश राताेरात हिराे झाला. त्याचे हे शाैर्य पाहून काैतुकाचा वर्षाव सुरू आहे.
पुण्यात बहुतांश भागात धूमधडाक्यात दहीहंड्या फुटल्या; पण चर्चा झाली ती प्रथमेशच्या हंडीचीच. प्रथमेश कराळे हा २०१५ पासून दहीहंडी फाेडण्यात भाग घेत आहे. मात्र, यावर्षीचा दहीहंडी फाेडण्याचा त्याचा अनुभव अनाेखाच हाेता. या दहीहंडीने त्याला एक नवी ओळख दिली.
याबाबत प्रथमेश म्हणाला, ‘दहीहंडीसाठी महिनाभरापासून प्रॅक्टिस केली. जवळपास ३०० ते ३५० गाेविंदा जणांचे हे पथक असून यामध्ये सर्वांच्या मेहनतीचा कस लागताे.’ प्रथमेश सध्या बीबीएच्या तिसऱ्या वर्षाला आहे. त्याचे वडील कुरिअरमध्ये काम करत असून त्यांना ताे हातभार लावताे व शिक्षणही करताे आहे.या दहीहंडीच्या व्हिडिओनं सर्वांचं विशेष लक्ष खेचून घेतलं. गणेश मित्रमंडळातील हा गोविंदा दहीहंडी फोडायला चढला खरा पण... दहीहंडीलाच चक्क ४० सेकंद लटकून राहिला. वर लटकूनही दहीहंडी फोडतच राहिला.
मी उडी मारली आणि सर्वांनी मला अलगद झेलले
गेल्या सात वर्षांत मी अशा प्रकारच्या ४० ते ५० दहीहंड्या फाेडल्या आहेत. यावेळी वर लटकलाे असलाे तरी घाबरलाे नाही. मटकी फाेडून मी मनाेऱ्यावरील गाेविंदा खाली गेले व त्यांनी हाताची साखळी केली. त्यावेळी मी उडी मारली आणि सर्वांनी मला अलगद झेलले. - प्रथमेश कराळे, गाेविंदा.