पुणे : ' भगवी वस्त्र परिधान केल्याने पुरोगाम्यांनी समजून घेतले नाही, आणि भगव्या वस्त्रांमुळे विवेकानंदांना आपले मानणा-यांनीही विवेकानंद पूर्ण समजून घेतले नाही, हे दुर्देव आहे , शब्दात लेखक आणि विवेकानंद यांचे अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी पुरोगाम्यांवर टीका केली. धर्मातील फक्त मुलभूत सिध्दांत महत्वाचे असतात, कोणी काय खावे, काय परिधान करावे, हे वैयक्तिक असते, समाजाशी त्याचा संबंध नसतो असे सांगणा-या आणि मी समाजवादी आहे, असे म्हणणा-या स्वामी विवेकानंदांची खरी ओळख समजून घेतली पाहिजे, ' असेही दाभोळकर म्हणाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ' राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त 'स्वामी विवेकानंदांची खरी ओळख ' या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी युवक क्रांती दलाचे सचिव संदीप बर्वे यांनी डॉ. दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन व डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी उपस्थित होते.डॉ. दाभोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांची अनेक अपरिचित पैलूंची ओळख करून दिली. गोहत्या, जरठ विवाह, पुरोहित शाही, स्त्री पुरुष समानता , याबाबत विवेकानंद यांची मते परखड होती, असे डॉ. दाभोळकर यांनी विवेकानंद यांच्या भाषणांचे,पत्रांचे संदर्भ दिले. जरठ विवाह मानणा-या समाजाला कसला आलाय धर्म ? असा प्रश्न विवेकानंद यांनी संमती वयाच्या कायद्याबद्दल लिहताना केला होता. स्त्री प्रश्नावर त्यांची मांडणी भेदक आहे. अमेरिकेत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात म्हणून तेथील समाज प्रगत आहे, असे त्यांनी पत्रात लिहले आहे. मंदिराची खरी गरज वेश्येला आहे, ती शोषण झालेली सर्वात पददलीत व्यक्ती असते असे त्यांनी लिहिले आहे. मंदिरात सभ्य मंडळींचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणत. जातीव्यवस्था जन्मगत आहे, आणि निग्रोपेक्षा अधिक अत्याचार दलितांवर केलेत. जाती मेल्या नाहीत, तर त्या कुजून समाजाला त्रास होईल, असे कुंभ कोणम येथील भाषणात म्हणाले होते. निसर्गात समता नसेल, तर ती निर्माण करण्यासाठी माणसाला निर्माण केले आहे, असेही विवेकानंद यांनी लिहिले होते. या देशाची अर्थव्यवस्था मोडल्याशिवाय जाती व्यवस्था मोडणार नाही, असे मानणारे विवेकानंद हे दार्शनिक आहेत.जिथे जास्त पुरोहितशाही आहे, तिथे मोठया संख्येने हिंदू ख्रिस्ती झाले, तर दोष कोणाला देणार ? असा सवालही त्यांनी त्रावणकोर संस्थान संदर्भात त्या काळच्या धर्मांतराबद्दल मत मांडले होते. आपल्याला नवा भारत घडविण्यासाठी नवा देव, नवा वेद घडविला पाहिजे, हेही विवेकानंदांनी स्पष्टपणे मांडले होते. मात्र ,सर्व समाजवादी सिध्दांतांना अध्यात्माची जोड दिली पाहिजे , असेही विवेकानंद मानत. एकच माणूस एकाच जन्मात दार्शनिक, संघटक, कार्यकर्ता, खजिनदार होऊ शकत नाही, हीच माझी चूक झाली, मी फक्त दार्श निक म्हणून मांडणी करायला हवी होती, मात्र, माझी हाडेही चमत्कार करतील, असे म्हणणारा विवेकानंद यांचा दुर्दम्य आशावाद होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भगवी वस्त्र परिधान केल्याने पुरोगाम्यांनी विवेकानंदांना समजून घेतले नाही : डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 9:38 PM