पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो, असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित विज्ञानगप्पांच्या मालिकेतील पहिल्या पुष्पात डॉ. बोरकर ‘जीवाश्म माझ्याशी काय बोलले’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र परदेशी, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विनय र. र. म्हणाले, ‘आयसरबरोबर विज्ञानगप्पाचे पहिले सत्र यशस्वी झाल्यानंतर आता फर्ग्युसन महाविद्यालयांसोबत या गप्पा होणार आहेत. विविध शास्त्रज्ञांशी गप्पा मारण्याची संधी या व्याख्यानमालेतून मिळत आहे. मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबवत आहे.’
बोरकर म्हणाले, ‘गेली पाच दशके भारतीय द्वीपकल्पातील विविध पाषाणसमूहांमधे आढळणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास करत असताना अनेक स्वारस्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळाल्या. साडेसत्तावीस कोटी वर्षांपूर्वी सागरी प्राण्याच्या मादीने केलेल्या भ्रूणकोष्टाचे अवशेष सापडले. त्यावरून अंड्यांच्या संरक्षणासाठी बिळे करण्याची प्रवृत्ती किती पुरातन आहे, हे दिसून आले. प्राण्यांची त्रिस्तरीय रचना समजली. मासे, बेडूक, शिंपले, विविध प्रकारचे खडक यावरून जीवसृष्टी अभ्यासण्यात मदत झाली. सागरी मासे नदीच्या प्रवाहाच्या विरोधात प्रवास करून सरोवरात कसे येतात, हे अभ्यासात आले. परदेशी व भारतीयांच्या मनात जीवाश्मांविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या आणि आहेत.’
प्रा. रवींद्र परदेशी यांनी स्वागत केले. नीता शहा यांनी सूत्रसंचालन केले. संजय मालती कमलाकर यांनी आभार मानले.