मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथे राणुबाई मंदिराजवळ असलेली काळपट्टी व घोटीमळा येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे उघड झाले आहे. शेतकरी महेश दिनकर थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांना दोन बिबट्यांनी रात्री सात ते आठच्या सुमारास दोनदा दर्शन दिले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच संदेश थोरात व उपसरपंच गजाबा थोरात यांनी केली आहे.कळंब-राणुबाई मंदिर रस्त्यावरील काळपट्टी या ठिकाणी शेतकरी महेश दिनकर थोरात शेतमजूर यांच्यासह मेथीच्या भाजीवर फवारणी करत असताना अंधारात त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. मोबाइलची बॅटरी आवाजाच्या दिशेने चालू केली असता त्यांना दीडशे फूट अंतरावर शेताच्या बांधावर चार डोळे चमकल्याचे दिसले व त्या डोळ्यांची हालचाल वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे जाणवले. त्याचक्षणी हे बिबटे असावेत अशी भीती मनामध्ये येऊन शेतमजुरांना शेतामधून रस्त्याच्या दिशेने पळा, असे मोठ्या आवाजात सांगितले.शेतकरी राजेंद्र अर्जुन थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात वाहनामधून शाळेतून आपल्या घरी चालले होते. त्यांना थांबवून शेताच्या बांधावर बिबटे आहे का, याची खात्री करण्यासाठी गाडीची लाईट बिबट्यांच्या दिशेने मारली असता मुख्य रस्त्यापासून सुमारे चारशे फुट अंतरावर दोन बिबटे मारामारी करत असल्याचे दिसले. पण माणसांचा आवाज व गाडीचा उजेड यामुळे बिबट्यांनी तेथून उत्तरेकडे असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. त्याचवेळी काही घरगुती कामानिमित्त शिक्षक थोरात हे माघारी कळंबला जाऊन पुन्हा घरी निघाले असता त्यांना रात्री आठच्या सुमारास राणूबाई मंदिरजवळील घोटीमळा येथे पुन्हा तेच दोन बिबटे डांबरी रस्त्यावर बसलेले दिसले. त्यानंतरते बिबटे डांबरी रस्ता सोडून शेतीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याने पूर्वेकडे निघाले. त्या ठिकाणी एक बिबट्या रस्त्यावर व एक बिबट्या मका शेताच्या बांधावर उभा होता. याचवेळी शेतकरी संतोष नंदाराम थोरात व लक्ष्मीबाई थोरात यांनी पण बिबटे असल्याचे पहिले. त्यांनर ते बिबटे मका शेतात दिसेनासे झाले. सरपंच संदेश थोरात, उपसरपंच गाजबा थोरात यांच्यासह ग्रामस्थ यांनी शिक्षक थोरात यांची घरी भेट घेऊन घडलेला भीतीदायक प्रसंग समजावून घेतला. वारंवार होणारे विजेचे भारनियमन यामुळे रात्री शेतकºयांना आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते, अशा वेळी बिबट्याने हल्ला केल्यास अनुचित प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणूनवीज महामंडळाने भारनियमनात बदल करावा, अशी मागणी उपसरपंच गजाबा थोरात व शेतकºयांनी केली आहे.
लौकी परिसरात आढळले बिबटे; ग्रामस्थ दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:32 AM