पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये सलग चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार सुरु होते. आजवर ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी गोपनीय बाब असल्याच्या नावाखाली बोलणे टाळले होते. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने ललित पळून जाण्यासाठी जबाबदार असलेल्या २ अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यामुळे डॉ. ठाकूर आणि ससूनमधील यंत्रणा यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पोलिसांनी ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डमधील वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्यानंतर ललितवर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हे स्वत: उपचार सुरू करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी तपासासाठी या वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्या आहेत.
पुणे पोलिसांनी ललित पाटील प्रकरणाच चांगलीच कंबर कसली असून हिंजवडी पोलिस ठाण्यात जीन्यावरून पडून जखमी झाल्याची बतावणी करणाऱ्या ललितचे तीन वर्षापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटी १४ लाख रुपयांचे एम डी जप्त करण्यात आले. याप्रकरणात ललितच्या साथीदारांना गुन्हे शाखेने अटक केली. ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली दाखल झालेल्या ललिलला पोलिसांनी अटकेची नोटीस बजावली होती.
कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याला अटक करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच २ ऑक्टोबर रोजी त्याला ससूनमधील कैद्यांच्या वाॅर्ड क्रमांक १६ मधून पळून लावण्यात आले. त्यानंतर १६ दिवसांनी ललितला बंगळुरू येथून मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली. ललितवर उपचार करणाऱ्या ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. त्याच्यावर नेमक्या कोणत्या आजारावर उपचार करण्यात येत होते, याबाबत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. पोलिसांनी वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये दाखल झालेल्या कैद्यांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या नोंदी ताब्यात घेतल्या आहेत. ललितला मूत्रपिंड विकार (हर्निया) होता. त्याच्यावर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेच उपचार करत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.