भिगवण : भिगवण परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका वाढीस लागली असून, एकाच दिवशी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत एक महिला व एक पुरुष मृत्युमुखी पडले. सहा जण गंभीर जखमी झाले. अतिवेगाने टायर फुटून अपघात वाढत असल्याने वाहने चालविताना वेगाचे भान ठेवण्याची गरज असल्याचे मत अपघातानंतर सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी व्यक्त केले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर सकुंडे वस्तीजवळ सर्व्हिस रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले होते. यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अशोक रामलिंग सुतार (वय ५१, रा. भिगवण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. तर गणेश पिराजी सोनावणे (रा. खेड, ता. कर्जत) हे गंभीर जखमी झाले आहेत. याच मार्गावर बिल्ट कंपनीजवळ एका महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेली महिला उपचारादरम्यान मृत्युमुखी पडली. भिगवण पोलिसांकडे कोणतीही माहिती न आल्याने महिलेचा नाव, पत्ता समजू शकला नाही.डाळज गावच्या हद्दीत याच दिवशी मध्यरात्री कारचा (एम.एच.१२ जे.यू.३३३२) पाठीमागचा टायर फुटून कार उलटून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. रामलिंग बाबासाहेब हिरे (वय ४९), सुजाता हिरे (वय ३८), संगीता लोखंडे (वय ३५), सचिन गुळवे (वय ३७, सर्वजण रा. मार्केट यार्ड, पुणे) यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जखमींना दवाखान्यात पोहोचवून ड्युटी आटपून घरी जाताना पोलीस जवान गोरख पवार यांच्या दुचाकीला खानावटे गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात पवार यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली.
एकाच दिवसात चार अपघात
By admin | Published: April 24, 2017 4:27 AM