पुणेः फुरसुंगीजवळ झालेल्या पीएमपी चालकाच्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला यश आले असून १२ तासांच्या आत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. विरोधी गटातील व्यक्तीला एका गुन्ह्यात जामीन राहिल्याच्या कारणावरुन हा खुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न् झाले आहे.
ऋषीकेश संजय बोरगावे (वय ३१, रा. भेकराईनगर फुरसूंगी), अक्षय हनुमंत जाधव (वय २१, रा. फुरसूंगी), प्रज्वल सचिन जाधव (वय २०, रा. काळेपडळ), तुषार सुर्यकांत जगताप (वय २१,रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील ऋषीकेश व अक्षय या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरागा येथून तर इतर दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय २९, रा पापडेवस्ती फुरसूंगी) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. पीएमपी चालकाला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून चेहरा विद्रूप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकल्याचा प्रकार रविवारी (दि. 11) दुपारी उघडकीस आला होता.
गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक देखील संशयित आरोपींच्या मागावर होते. त्यावेळी पोलिस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले,ऋषीकेश टिळेकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना हा खून ऋषीकेश बोरगावे व अक्षय जाधव यांनी केला असल्याचे समजले. सध्या ते दोघे उस्मानाबाद येथे पळून गेले आहेत. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने उमरगा येथून ऋषीकेश व अक्षय या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आकाश राठोड़, प्रज्वल जाधव व तुषार जगताप यांच्या मदतीने गौतम उर्फ अमोलचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने केली.
या कारणामुळे केला खून...
आरोपींची मागील काही दिवसापुर्वी गौतम याच्या एका मित्रासोबत वाद झाले होते. तो देखील पीएमपीमध्ये चालक म्हणून काम करतो. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात गौतम हा त्याला जामीन राहिला होता. तेव्हापासून आरोपी गौतमवर चिडून होते. त्यातूनच त्यांनी दारु पिण्याच्या बहाण्याने गौतमला रिक्षात बसवून हांडेवाडी परिसरात नेले. तेथे गेल्यावर दारु पिल्यानंतर गौतमला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला होता. त्यानंतर तेथून सर्वांनी पळ काढला होता.