पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जात असलेल्या आरटीईच्या पुणे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण जागांसाठी सुमारे चौपट अर्ज आले आहेत. परंतु,कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेश घेताना अडचण येणार नाही, बाबत शिक्षण विभागाने काळजी घेऊन लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्यात आरटीई प्रवेशाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. त्यामुळे आपल्या पाल्याला आरटीईतून प्रवेश मिळावा ,यासाठी अनेक पालक प्रयत्न करतात. त्यातच राज्यातील सर्वाधिक आरटी प्रवेशाच्या जागा पुण्यात उपलब्ध आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी ९८५ शाळांनी नोंदणी केली आहे पुण्यात आरटीई प्रवेशाच्या १४ हजार ७७३ जागा उपलब्ध असून त्यासाठी ५५ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे. आता प्रवेशाची लॉटरी केव्हा काढली जाणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुद्धा अर्ज पडताळणी समितीची बैठक घेऊन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी; याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच संबंधित अधिका-यांची बैठक घेतली जाणार आहे.
--------------
कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. मात्र, शिक्षण विभागाने पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक बाबींची पूर्तता करावी. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता येईल, यादृष्टीने शाळांमध्ये लवकर प्रवेश मिळवून द्यावा.
- भाग्यश्री गायकवाड, पालक
-----------
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी शिक्षण विभागाने लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करावे.
- पंकज आवारे, पालक
---------------
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आरटीई प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा,यासाठी पडताळणी समितीचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. तसेच या समितीमधील सदस्यांची बैठक बोलावून त्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील. सर्व प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
--------
पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची आकडेवारी
नोंदणीकृत शाळा : ९८५
उपलब्ध जागा : १४, ७७३
प्राप्त अर्ज : ५५,८३३
---------------
पालकांचे लॉटरीकडे लक्ष
शिक्षण विभागाकडे आरटीई प्रवेशाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आता पालकांचे ऑनलाईन लॉटरीकडे लक्ष लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑनलाईन लॉटरी केव्हा काढली जाणार आणि प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार, बाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.