पुणे : आयुर्विमा पॉलीसीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका अभियंत्याला १ कोटी ८५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी हरियाणा येथील फरिदाबादमधून अटक केली आहे़. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड असा माल जप्त केला आहे़ प्रमोद भगतसिंग राणा (वय २९), दिनेशकुमार रामकुमार गाढरी (वय २६), राहुल राजपाल सिसोदिया (वय २३), अमनदिप सरमतसिंग बैसला (वय २६, चौघे रा. दिल्ली)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़, ते हरियानामधील फरिदाबाद येथे कॉलसेंटर चालवित होते़. याप्रकरणी सुनिल चिंतामणराव नंदनकर (वय ५५,रा. संपन्न होम्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. नंदनकर हे मनमाड येथील आॅईल कंपनीत व्यवस्थापक आहेत़ त्यांच्या पॉलिसीची मुदत संपली असल्याची बतावणी आरोपींनी २०१३ मध्ये नंदनवार यांच्याकडे केली होती. नवीन पॉलिसीत गुंतवणूक करा.चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन ते नंदनकर यांच्याशी गेले ५ वर्षे संपर्कात होते़ वेळोवेळी नंदनकर यांना वेगवेगळ्या बँकेत १ कोटी ८५ लाख रुपये भरण्यास सांगितले होते. नंदनकर यांनी रक्कम बँक खात्यात जमा केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडून टाकला होता़ त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हडपसर पोलिसांच्या बरोबरीने सायबर क्राईम सेल समांतर तपास करीत होती़.तांत्रिक तपासात आरोपींनी फसवणूक करण्यासाठी वापरलेली बँक खाती उत्तरप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले होते. तपासात आरोपींचा वावर दिल्ली, हरियाणा, नोएडा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस व सायबर सेलच्या पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले. हरियाणातील फरिदाबाद शहरात आरोपी चालवित असलेल्या कॉलसेंटरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, विश्वजीत खुळे, उपनिरीक्षक राहुल घुगे, शंकर नेवसे, अनिल वनवे, किरण अब्दागिरे, अमित औचरे यांनी ही कारवाई केली.
अभियंत्याला गंडा घालणाऱ्यांना हरियाणातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 9:27 PM