लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी पुणे शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने वाघोली(ता. हवेली) येथे कारवाई करून चौघांना अटक केली आहे. एक रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वाघोलीत एकाला इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील अधिकारी व कर्मचारी हे वाघोली परीसरात पेट्रोलींग करीत हाेते. यावेळी पोलीस नाईक साहील शेख यांना एक व्यक्ती रेमडेसिविर इंजेक्शन बॉटल वाघोली येथील केसनंद फाटा बसस्टॉप जवळ बेकायदेशीर रित्या विकत आहे अशी माहिती त्यांना मिळाली. त्यांनतर बनावट ग्राहक तयार करुन या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने छापा टाकला असता लक्ष्मीकांत विष्णु ढेंगळे (वय २१,रा. वाघोली), योगेश सेवालाल राठोड (वय २२, रा लोंढेवस्ती थेरगांव) हे दोन तरुण या ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन एक नग बेकायदेशिररित्या अवैध मार्गाने मिळवुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता कोणताही परवाना नसताना डॉकटर यांच्या प्रीसक्रीप्शन शिवाय, विना कोव्हीड तपासणी अहवाला शिवाय, छापील किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विक्री बिला शिवाय, विक्री करणे करीता स्वतःऔषध व्यवसायीक असल्याचे भासवीत फसवणुक करीत रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी हे इंजेक्शन नानासाहेब वसंत साळवे (वय ३२, रा.साईविहार सोसायटी), शुभम सुदाम मुखेकर (वय २३, रा बकोरीफाटा) यांचेकडुन मिळाल्याचे सांगीतले त्यांनतर चौघांना तपासकामी ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द औषध निरीक्षक श्रुतीका जाधव यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.