पुणे/ विमाननगर - येरवड्यात झालेल्या संदिप देवकर निर्घृण खूनप्रकरणी फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ पठाण (२५) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री जेरबंद केले. संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर यांचा गेल्या रविवारी (६) डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनाच्या गंभीर गुन्ह्यात गणेश शांताराम चौगुले ऊर्फ बोरकर( २४), विशाल नागनाथ कांबळे (२२), रोहित प्रकाश कोळी (२६), मयूर सुनिल सूर्यवंशी (२५) या चौघांना पुणे स्टेशन परिसरातून सापळा रचून येरवडा पोलिसांनीअटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद व आरोपी अशरफ पठाण हे दोघे फरार होते. तब्बल चार दिवसांनंतर या खूनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना येरवडा पोलिसांनी पकडले.
फरार आरोपी अशरफ हा गुन्हा करुन औरंगाबाद येथे फरार झाला होता. येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. शनिवारी अशरफला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी शंकर पाटिल, गणेश सांळुखे, रमेश राठोड, रमेश साबळे, भालचंद्र बोरकर यांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. अशरफ हा येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढिल तपासासाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद याचा पोलीस शोध घेत आहेत.