बारामती : गुरुवारी (दि. १५) असणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी बारामती नगरपालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी ४ कृत्रिम तलाव व ७ जलकुंभ ठेवले आहेत. शहरातील गणेशविसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाने हे नियोजन केले आहे.नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले, की शहरातील खंडोबानगर जुना टोल नाक्याजवळ, कसब्यात ढवाण पाटील सर्कलशेजारी, इंदापूर रस्त्याजवळ मोतीबाग चौक, भिगवण रस्त्यावर बारामती बँकेशेजारी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. याशिवाय, नीरा डावा कालव्यानजीक ज्येष्ठ नागरिक संघानजीक, तीन हत्ती चौक, श्री दत्तमंदिराजवळ, तुपे बंगल्यानजीक, परकाळे बंगल्यानजीक, गरुडबागेशेजारी, माळावरच्या देवीजवळ मूर्ती विसर्जनासाठी जलकुंभ ठेवण्यात आले आहेत. नगरपालिका प्रशासन यंदा अमोनियम बायकार्बाेनेटची पावडर मिसळणार आहे. यामध्ये मूर्ती विसर्जन केल्यावर ४८ तासांत ती विरघळते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे साध्या पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या या जलकुंभ, कृत्रिम तलावात नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन करावे व निर्माल्य कलशातच टाकावे. विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती....विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जन नियोजनासाठी पालिकेच्या १८ पथकांचीदेखील नियुक्ती केली आहे. यामध्ये पालिकेचे १५ अधिकारी, ५४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सकाळी ८ पासून विसर्जन पूर्ण होईपर्यंत पथके कार्यरत राहणार आहेत. मिरवणुकीसाठी गणेश मंडळांना फुलांच्या पाकळ्या देणार आहेत. बारामती शहरातील विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले, की विसर्जन मिरवणुकीची पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ अधिकारी, ५५ स्थानिक कर्मचाऱ्यांसह बाहेरील २० कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित राहतील. तसेच, गृहरक्षक दलाच्या ४० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येईल. मिरवणुकीच्या मार्गानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात संबंधित मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. बारामती शहरात मिरवणूक डीजे, गुलालविरहित काढण्यात येते. हा आदर्श कायमस्वरूपी राहणार आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मार्गावर विसर्जन मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे जाधव म्हणाले.
विसर्जनासाठी चार कृत्रिम तलाव
By admin | Published: September 14, 2016 12:55 AM