देऊळगावराजे : पेडगाव येथील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या चार बोटींना जलसमाधी देण्यात आली. भीमा नदीपात्रात उपसा होत असल्याची माहिती पेडगाव येथील नागरिकांनी तहसीलदारांनी दिली होती. दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी रविवारी सकाळी तालुक्यातील सर्वच महसूलचे कर्मचारी तलाठी व सर्कल यांचे एक पथक तयार करून पेडगाव येथे चार यांत्रिक फायबर बोटीला जलसमाधी देण्यात आली. ही कारवाई बराच वेळ चालली होती. वाळूचोरांचे अंदाजे पंधरा ते अठरा लाखांचे नुकसान करण्यात आले. या सर्व यांत्रिक बोटी व वाळू साठवण्याचे फायबर जिलेटिनच्या साह्याने फोडण्यात आले. त्यांनतर पेडगाव येथील साखरी पुनर्वसन येथे वनविभागातील हद्दीत पाच ते सहा यांत्रिक बोटी पकडण्यात आल्या. त्या सर्व बोटी वनपाल भोसले यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. वाळूचोरांना कारवाईची माहिती मिळताच वाळूचोर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी सांगितले, की वाळूउपशाची माहिती मिळताच या वाळूचोरांवर पर्यावरण अधिनियमाद्वारे कारवाई करून वाळूचोरांना लगाम घालणार असल्याचे सांगितले. नव्याने बदली होऊन आल्यापासून चोरटी वाहतूक करणाऱ्याकडून आतापर्यंत सोळा लाखांचा दंड वसूल केला आहे. साळुंखे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक तन्वीर सय्यद, देऊळगावचे सर्कल संजय स्वामी, भानुदास येडे, गिरीश भालेराव, प्रकाश भोंडवे, मोहन कांबळे, शिरापूरचे तलाठी बालाजी जाधव, संतोष येडुळे, मिलिंद अडसूळ, माणिक बारवकर, बापू देवकाते आदी कारवाईत सहभागी होते. (वार्ताहर)
चार बोटींना जलसमाधी
By admin | Published: October 10, 2016 2:21 AM