पिंपरी : सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना घडल्या. यामध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक तीन घटना घडल्या. रुपाली नंदकुमार येळवंडे (वय २२, रा. निकोजे, ता. खेड, पुणे) यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रहाटणीतील द्वारकासाई रेसिडेन्सीसमोरुन रुपाली पायी जात होत्या. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोनसाखळी हिसकाविली. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी सांगवीतील कृष्णा बाजार चौकातून पायी जात असताना जोसफिन आसिरवादम काला (वय ६३, रा. कृष्णा चौक, नवी सांगवी) या वृद्धाच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मीनाक्षी गजानन कुरदळे (वय ४०, रा. पिंपळे निलख) यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारला महापालिकेच्या बागेसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरदळे व त्यांचे नातेवाईक दुचाकीवरून मंदिरात दर्शनासाठी जात होते. दरम्यान, दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
सोनसाखळी चोरीच्या चार घटना
By admin | Published: May 12, 2014 3:49 AM