पुणे : शिक्षण मंडळातील सेवकांचा पगार काढण्यास उशीर करणे, कामावर वेळेवर न येणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला गैरहजर राहणे, या कारणांमुळे शिक्षण मंडळातील चार बिल क्लार्कचे निलंबन करण्यात आले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही कारवाई केली. शिक्षण मंडळात शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या वेतनवाटपात नेहमीच उशीर होत असल्याने ही कारवाई केली आहे. शिक्षण मंडळात वेतन अदा न करणे, निवृत्तिवेतन थांबविणे, आदी प्रकार वारंवार होत असल्याचे निदर्शनास आल्याने, याचा आढावा घेतला असता याला काही मोजकेच बिल क्लार्क जबाबदार असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार या चारजणांचे निलंबन केले आहे.
कंत्राटी शिक्षक भरणार
महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे आंतरजिल्हा बदलीने २१९ शिक्षकांना हजर होण्यास सांगण्यात आले होते. यांपैकी केवळ ३७ जणच प्रत्यक्ष कामावर रुजू झाले. त्यामुळे सध्या शिक्षण मंडळाच्या मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत येत्या शुक्रवारपर्यंत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती रवींद्र बिनवडे यांनी दिली.
सॅलरी सिस्टम सॉफ्टवेअर होणार अवलंब :
महापालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांनाही वेळेत पगार मिळावा, पेन्शन वेळेवर मिळावी, याकरिता महापालिका प्रशासनाने यापुढे सॅलरी सिस्टम सॉफ्टवेअरचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी, रजा ऑनलाइन नोंदविली जाणार आहे. कुठल्याही कर्मचाऱ्याला रजा घ्यावयाची असल्यास त्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, तो या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होणार आहे. यात हजेरी, रजा यांची नोंद होऊन कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जाईल. याची सुरुवात येत्या ऑगस्टपासून होणार आहे.