पुणे : पर्यावरण अहवालावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या सभेला अवघे चार नगरसेवक आणि उपमहापौर उपस्थित होते. माजी संरक्षण मंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनामुळे सभा तहकूब होणार असल्याची कल्पना असतानाही नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी पालिकेत येण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे ‘माननियां’वर टीका होऊ लागली आहे.प्रशासनाने शहरातील पर्यावरणाचा अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल जुलै २०१८ मध्ये पालिका सभागृहासमोर ठेवण्यात आल्यापासून पर्यावरणाची खास सभा वेगवेगळी कारणे देत तहकूब करुन पुढे ढकलण्यात येत आहे. पर्यावरणाची तहकूब सभा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या नवीन सभागृहामध्ये बोलावली होती. जॉर्ज फर्नांडीस यांचे मंगळवारी निधन झाल्याने ही सभा तहकूब होणार असे जवळपास निश्चित होते.सभा सुरू झाल्यावर फर्नांडीस आणि माजी सहायक आयुक्त मुकुंद भोसले या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीपर बोलण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने भिमाले यांनी तहकुबी मांडली. तहकुबी वाचताना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी श्रद्धांजलीपर बोलून तहकुबीची घोषणा केली. तहकुबीचे वाचन सुरु असताना नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे, मंजूश्री खर्डेकर आणि अनुसया चव्हाण यांनी सभागृहात प्रवेश केला.फर्नांडीस यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, या सभेला अवघे चारच नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे नटनेते अरविंद शिंदे, शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका संगीता ठोसर यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चारच नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 3:25 AM