ओतूर : माळशेज घाटातील रस्ता दरड कोसळल्याने मागील चार दिवसांपासून बंद होता. आता त्यावरील दगडमाती हटवून अखेर शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजता कल्याण-अहमदनगर आणि पुणे अशी वाहतूक सुरू झाली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून या घाटरस्त्यावर पर्यटकांना सध्या प्रतिबंध केला आहे.
कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोळसली होती. यात एक चालक जखमी झाला होता. त्याच्या टेम्पोचा मात्र या अपघातात चक्काचूर झाला. त्यानंतर, या घाटातील रस्त्यावरील दगडमाती हटवण्याच्या कामात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाची यंत्रणा गुंतली होती. परंतु, सततच्या जोरदार पावसामुळे व दाट धुक्यात या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर, चौथ्या दिवशी रस्त्यातील माती, दगड हटवण्यात बांधकाम विभागाला यश मिळाले. यामुळे आताच वाहतूक सुरू केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.