पुणे : मॉन्सूनने गुरूवारी (दि.२७) देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भागात मॉन्सून मजल मारेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाजही दिला आहे.
दरम्यान, पुण्यात अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत आहे. परंतु, जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. परंतु, पुढील दोन-तीन दिवस पावसाचे राहणार आहेत. पालखी सोहळ्यासोबत वरूणराजाही पुण्यात येणार आहे. हवामान विभागाने गुरूवारी (दि.२७) कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि खान्देश, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित भागामध्येही हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.
शुक्रवारी (दि.२८) कोकण, पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कोकण आणि विदर्भामध्ये वाढणार आहे.
दरम्यान, माॅन्सूनने देशाच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. मॉनसून गुरूवारी संपुर्ण गुजरात आणि अरबी समुद्रात पोचला आहे. तसेच मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, बाल्टीस्तान, मुझफ्फराबादचा बहुतेक भाग व्यापला आहे. माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार झालेले असून, पुढील २ ते ३ दिवसांमध्ये राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.