रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावामध्ये चासकमानच्या चालू आवर्तनाचे पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून द्यावा, अन्यथा रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी एका निवेदनाद्वारे दिल्याची बातमी दै. लोकमतमध्ये दि.२४ रोजी फोटोसह प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन चासकमान प्रकल्प उपअभियंता यांनी तातडीने कार्यवाही करून चालू आवर्तनातून चारच दिवसांत कोंढापुरी तलाव पाण्याने ७५% क्षमतेने भरून दिल्याने तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यावर पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या विविध गावच्या नागरिकांनीही पाणीटंचाई दूर झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या बाबत निवेदन देण्यात आले होते त्यांच्या सूचनेनुसार व लोकमतच्या बातमीमुळे चासकमानच्या अधिकाऱ्यांनी तलावात पाणी सोडल्याचे पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले.कोंढापुरी ग्रामपंचायतीनेही तलावात पाणी सोडण्याची मागणी यापूर्वी केली होती. कोंढापुरी तलावात पाणी सोडल्यानंतर आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड,माजी सदस्य उमेश दरवडे,मुक्ता बांगर,गणेश ढोकले, मारुती नरवडे,अविनाश नळकांडे,पोपटराव गायकवाड आदींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
या निवेदनात पुढे म्हटले होते की,सध्या उन्हाळ्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेटी घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती .
या तलावातील पाण्यावरती रांजणगाव गणपती, कोंढापुरी, खंडाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, वरुडे , वाघाळे या गावातील नळपाणीपुरवठा योजना व परिसरातील हजारो एकर शेती अवलंबून असल्याने चासकमानच्या अधिकाऱ्यांनी या तलावात प्रत्येक आवर्तनाला पाणी सोडावे, अशी मागणी मानसिंग पाचुंदकर यांनी या वेळी केली आहे.
कोंढापुरी तलावात पाणी सोडल्यानंतर तलावाची पाहणी करताना मानसिंग पाचुंदकर, स्वप्निल गायकवाड व इतर.