केडगाव (पुणे) : पारगाव (ता. दौंड) हद्दीतील भीमा चार दिवसांत नदीपात्रात (दि. १८ ते २२) पर्यंत चार मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज (२३ जानेवारी) पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे उपस्थित होते.
सर्व मृतदेह तरुण असल्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. पारगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात दोन पुरुष व दोन स्त्रियांचे मृतदेह असून, सर्व मृतदेह हे अंदाजे ३८ ते ४५ वयोगटातील आहेत. एका पुरुषाचा मृतदेह नदीपात्रातून काढण्याचे काम रविवारी (दि. २२) रोजी उशिरा काढण्यात आला. एका पुरुषाच्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. यावरून तपासाला दिशा मिळाली असून यवत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आहेत.
पाच दिवसांत चार मृतदेह-
पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवार दिनांक १८ रोजी एका स्त्रीचा मृतदेह त्यांना आढळून आला. तसेच परत शुक्रवार दि. २० रोजी पुरुषाचा, शनिवार दि. २१ रोजी पुन्हा स्त्रीचा व रविवार दि. २२ रोजी एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस ४ मृतदेह आढळून आले.भीमा नदीपात्रात पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणे बरोबरच स्थानिकांनाही पडला आहे. एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तर्क-वितर्काना उधाण आले आहे.
अजून मृतदेह सापडण्याची शक्यता?चार मृतदेह सापडले असून संबंधित पती-पत्नी जोडी आहेत, असा तर्क लढवला जात आहे. अजून त्यांची तीन मुले मुली सापडण्याची शक्यता असून नदीपात्रात शोधण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत चालू होते. महानगरपालिकेची रेस्क्यू टीम या ठिकाणी शोधण्याचे काम करीत आहे.