चाकण/हडपसर : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाकणमधील खासगी रुग्णालयात तीन जणांचा तर, पुण्यातील शेवाळवाडीतील एकाचा मृत्यू झाला.
चाकणमधील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ऑक्सिजन संपल्याने २० गंभीर रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले. मात्र, गंभीर असलेल्या ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यात २५ वर्षीय युवकासह ४५ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने संबंधित २० रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना हलवण्याच्या सूचना केल्या. काही रुग्णांना नातेवाइकांनी हलवले. मात्र अन्य रुग्णांच्या नातेवाइकांना कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईक देखील हतबल झाले. अखेरीस यातील तीन रुग्णांनी एका रुग्णालयातून अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ऑक्सिजनअभावी प्राण सोडले.
चाकणमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यानंतर सोमवारी नातेवाइकांनी चाकणजवळील महाळुंगे येथून ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी धावाधाव केली. त्यानंतर काही ऑक्सिजन सिलिंडर मिळाले. मात्र, मंगळवारी पहाटे ते सिलिंडरसुद्धा संपले. त्यामुळे तब्बल ३ कोरोना रुग्णांची जीवनयात्रा देखील संपली. यात आणखी काही मृत्यू झाले आहेत का? या बाबतची पडताळणी सुरू असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. मृत्यू झालेल्यांपैकी ३ मृतदेहांवर चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील गॅसदाहिनीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
हडपसरजवळील शेवाळेवाडी येथील योग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच ऑक्सिजन संपल्याने एकाचा मृत्यू झाला.
रुग्णालयात ५३ बेड असून, ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील ऑक्सिजनही संपत आला होता. आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर सात सिलिंडर मिळाले. डॉ. अभिजित दरक म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये २३ ऑक्सिजन बेड आहेत, १२ व्हेंटिलेटर बेड असून, कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांना एका तासाला सात ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. आता फक्त एक-दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे.