लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड उपचारासाठी शासन मान्यता असलेल्या चाकण येथील एका खासगी रुग्णालयाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिलाची आकारणी केल्याबद्दल रुग्णालयाच्या संचालकांसह दोन डॉक्टरांविरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राजगुरूनगरच्या सत्र न्यायालयाने त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. रुग्णालयाच्या अतिरिक्त बिल आकारणीसंदर्भात एखाद्या खासगी रुग्णालयावर झालेली ही महाराष्ट्रातील पहिली कारवाई ठरली आहे.
डॉ. स्मिता राजेश घाटकर (वय ४५), डॉ. राजेश नारायण घाटकर (वय ४९ रा. चाकण), डॉ. राहुल वसंतराव सोनावणे ( वय ३८, हायवे दर्शन कॉलनी, जळगाव), डॉ. सीमा गवळी (वय ३९, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक) अशी अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्यांची नावे आहेत. चाकण (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक नंदा ढवळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुष्पा विजय पोखरकर (ओझर, ता. जुन्नर) यांनी १७ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रार केली होती. त्यांचे पती विजय पोखरकर हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांना लेण्याद्रीच्या सरकारी कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना २ सप्टेंबर २०२० ला चाकण येथील डॉ. स्मिता घाटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचे पती हे पंधरा दिवस उपचार घेत होते. त्यांच्या रुग्णालयाचा खर्च ३ लाख ८१ हजार तर, औषधांचा १ लाख ६७ हजार रुपये, असा मिळून ५ लाख ६३ हजार ५१० रुपये खर्च झाला. मात्र, १३ सप्टेंबरला त्यांच्या पतीचे निधन झाले.
त्यानंतर पोखरकर यांनी रुग्णालयाने दिलेले बिल शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याने ही रक्कम मला नामंजूर असल्याचा तक्रार अर्ज दिला केला. त्यांचा तक्रार अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. त्यांनी चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार लेखापरीक्षण केले असता १ लाख ४९ हजार ९०० रुपये आणि २ लाख ५३ हजार ३०० रुपये अवाजवी बिल आकारणी केल्याचे लक्षात आले.
लेखापालांचा अहवाल जिल्हाधिकारी आणि रुग्णालयाला पाठविण्यात आला. तक्रारदार यांची आगाऊ घेतेलेली रक्कम परत करण्याबाबत रुग्णालयाकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यांनी रक्कम परत न केल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चाकण पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी तक्रारदाराकडून केलेल्या अतिरिक्त बिल आकारणीचे पैसे परत करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.