पुणे : जिल्ह्यात सध्या ४,२०२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ३,५२४ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात असून, ६७८ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याचाच अर्थ जवळपास ८४ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे पहायला मिळत आहेत. दररोज ६०० ते ७०० रुग्णांची भर पडत आहे.
सध्या आढळून येत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉन ; भीती नको, काळजी हवी
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही जिल्ह्यात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२५ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग डेल्टापेक्षा पाच पटींनी अधिक आहे. मात्र, आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असा इशारा वैद्यक तज्ज्ञांनी दिला आहे. लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ११,६६,७९४
ॲक्टिव्ह रुग्ण - ४,२०२
रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण - ६७६
होम क्वारंटाईन रुग्ण - ३,५२४