सासवड घाटातून थोडं पुढे गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत उदाचीवाडी हे गाव आहे. समाजकल्याण विभागात काम करणारे रामदास भोसले, उदाचीवाडीचे तरुण नामदेव कुंभार, योगेश मगर आणि गो ग्रीनचे प्रशांत भालेकर या चौघांनी या मियावाकीसाठी कष्ट घेतले. लॉकडाऊन असताना अन् पाण्याची सोय करून रोपांना जगवले.
रामदास भोसले म्हणाले,‘‘पाणी फांउडेशनने या परिसरात डोंगरावर खड्डे तयार केले. त्यात पाणी साचून येथील पाणीपातळी वाढली. पूर्वी विहिरींना डिसेंबरपर्यंतच पाणी असायचे. नंतर खडखडाट व्हायचा. त्यामुळे आम्ही डोंगरालगत वन विभागाची पडीक जमीन होती. त्या ठिकाणी मियावाकी करण्याचे ठरविले. त्यासाठी आखणी केली. जून ते ऑगस्ट सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर २०२० पासून रोपं लावायला सुरवात झाली. तेव्हा पावसाचा हंगाम होता. त्यामुळे आम्ही पावसातही काम केले. रात्री तिथेच पठारावर टेन्ट टाकून झोपायचो. आता त्याचे फळ मिळत आहे.’’
————————-
पाणी देण्यासाठी शेततळं बनवलं
वड, पिंपळ, पेरू, पपई, शिवण, सोनचाफा अशी ६० हून अधिक देशी प्रजातींची रोपं येथे लावली आहेत. मियावाकी जंगल हे कमी जागेत अधिक झाडं लावण्याचा प्रकल्प आहे. आमच्या परिसरात कमी पाऊस असल्याने झाडं लावण्याचा निर्णय घेतला. डोंगरावरून येणारे पाणी थेट वाहून जाते. जर ही झाडं तिथं लावली तर पाणी धरून ठेवतात. म्हणून आम्ही मियावाकी तयार केलं. रोपांना पाणी देण्यासाठी शेततळं तयार केलं.
- नामदेव कुंभार, उदाचीवाडी
———————————-
पाण्याच्या लोंढ्यात सामान गेले वाहून
रोपांना योग्य खाद्य मिळण्यासाठी आम्ही कंपोस्ट खत, कोको पीट टाकले. त्यामुळे त्यांची वाढ अतिशय जोमाने झाली. या मियावाकीला संपूर्ण कंपाऊंड केले. ते देखील आम्ही चौघांनीच तयार केले. त्याविषयी काहीच माहिती नसताना ते उभारले. कारण मजूर मिळत नव्हते. गेल्या वर्षी खूप पाऊस झाल्याने आम्ही रात्री जिथे आराम करायचो, तिथं खूप मोठा लोंढा आला. त्यात आमचे सर्व सामान वाहून गेले. आम्ही सुदैवाने बचावलो. तीनदा अशी घटना घडली, असे रामदास भोसले यांनी सांगितले.
———————————