पुणे : खडकवासला गोऱ्हे खुर्द येथील बॅक वॉटरमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ९ मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यातील ४ जणी बुडाल्याचे समजत असून, दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे जवान तिथे पोचले असून ते इतर मुलींच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
खडकवासला बॅकवाॅटरला गोर्हे खुर्द, डोणजे येथे कलमाडी हाऊस फार्म आहे. त्याच्या मागील बाजूस ही घटना घडली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. त्यांना १० वाजता काॅल आला होता. त्यानंतर जवान घटनास्थळी पोचले आणि दोन मृतदेह बाहेर काढले. सुटीचा एन्जाॅय करण्यासाठी ९ मुली तिथे गेल्या होत्या. त्यातील चार जणी बुडाल्याची शक्यता आहे. पाण्याच्या प्रवाह खूप असल्याने त्या पाण्यात बुडाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी व स्थानिकांनी काही मुलींना बाहेर काढले आहे. एम्बुलन्स आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे शोध कार्य करत आहेत.
दरम्यान रविवारीच कॅनाल मध्ये एक मुलगा बुडून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही आज घटना उघडकीस येत आहे. खडकवासला बॅकवाॅटरमध्ये नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने केले होते व तरी देखील नागरिक जात असल्याने या घटना होत आहेत.