सुपे : बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील लव्हेवस्तीवर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे चार शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. ही घटना रविवार (दि. १६) सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान घडली. प्रसंगावधान राखून कुटुंबप्रमुखाने वेळीच वीजप्रवाह खंडित केला, त्यामुळे पुढील धोका टळला. या अपघातात शेतकऱ्याचे सुमारे ५८ हजार खर्चाचे नुकसान झाले.
याबाबत गाव कामगार तलाठी जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार: लव्हेवस्तीवरील सुरेश वसंत लव्हे यांनी शेळ्या आणि मेंढ्या पाळलेल्या होत्या. त्या चार शेळ्या व मेंढ्या पूर्ण वयात आल्याने त्यांच्यासाठी गिऱ्हाईक शोधत असतानाच रविवारी सायंकाळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. सायंकाळच्या वेळी नुकताच पावसाचा सडाका पडून गेला होता. त्यावेळी लव्हे यांच्या गोठ्यात एक शेळी, एक बोकड आणि दोन मेंढ्या सव्वा सातच्या सुमारास लव्हे यांच्यासमोर तडफडून मरताना दिसल्या. त्यामुळे लव्हे यांनी जास्त पुढे न जाता एका क्षणात विजेच्या ताराच्या अर्थिंगमध्ये वीज प्रवाह घुसल्याची कल्पना आली. आपल्याच शेळ्या-मेंढ्या तडफडत असल्याने घरातील इतर व्यक्ती मदतीसाठी पुढे निघाल्या. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखून लव्हे यांनी घरातील सर्वांना विद्युत प्रवाह सुरू असल्याची कल्पना दिली. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेतून वाचू शकले, अन्यथा अनर्थ घडला असता.
दरम्यान, येथील सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, गाव कामगार तलाठी एस. बी. जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी तलाठी यांनी चार मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या व मेंढ्यांचा पंचनामा केला. या वेळी सुमारे ५८ हजाराचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला. यासंदर्भात, हा पंचनामा तहसीलदार यांच्याकडे सुपुर्त करून नुकसानभरपाई वेळेत मिळण्याची मागणी करणार असल्याचे सरपंच पोमणे यांनी सांगितले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. महाकाळ यांनी शेळ्या व मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. तर, वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी ोऊन पहाणी केली. दरम्यान तातडीने या वस्तीवरील वीजपुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळल्याने वस्तीकरांनी सुस्कारा सोडला.
--